मुख्य संपादक अशोक गलांडे.
महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” सुरू करण्यात आली आहे . यात सर्वसाधारण शेतकऱ्यांना 10 टक्के तर अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ हा घेता येईल. या योजनेत शासनाने 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी सोलर पंप शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या “मागेल त्याला सोलर पंप” योजनेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी हेळसांड समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोलर पंप योजना वापरण्यासाठी संबंधित कंपन्यांशी करार करून पैसे भरले असले तरी, त्यांना पंपसाठी आवश्यक मटेरियल मिळण्यात विलंब होत आहे. कंपन्या मटेरियल पुरवठा करण्यात चार ते पाच महिन्यांचा विलंब करत आहेत. शेतकऱ्यांची ही स्थिती अत्यंत निराशाजनक झाली आहे. एका शेतकऱ्याने सांगितले, “आम्ही पैसे भरले आहेत, पण कंपनीकडून मटेरियल मिळत नाही. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.” शेतकऱ्यांचा आरोप आहे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळत नाही. योजनेत कंपनी निवडीची प्रक्रिया आणि मटेरियलच्या वितरणात असलेली अडचण शेतकऱ्यांसाठी नवा संकट निर्माण करत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतकरी जास्तीत जास्त प्रगती करणे आणि कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा वापरणे हे शासनाचे उद्दिष्ट असले तरी, या योजनेमध्ये प्रक्रियेतील अडचणी आणि कंपन्यांच्या दिरंगाईमुळे त्यांचे स्वप्न अपयशी ठरले आहे. “शासनाने योग्य काळजी घेतली असती तर आज आम्हाला योजनेचा पूर्ण फायदा मिळाला असता,” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांना एकमेकांमध्ये बोलताना हेही दिसून आले की त्यांना शासनावर पूर्ण विश्वास नाही. त्यांनी अशी मागणी केली की शासनाने आपल्या धोरणात तातडीने सुधारणा केली आणि योजनेला वेळेवर अंमलबजावणी दिली तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. “आम्ही रांगेत उभे राहून प्रतीक्षा केली आहे, पण अजूनही कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही,” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
योजनेतील अडचणी आणि विलंबामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे, आणि शासनाच्या अक्षम धोरणामुळे त्यांचे हक्क हनन होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे एकच मत आहे, “आता हवे ते फटाफट मिळाले पाहिजे.”
चौकट.
पैसे भरून देखील पोर्टल वर कंपन्या उपलब्ध नसल्याने ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहे ती शेतकरी संभ्रमात आहेत की त्यांची फसवणूक तर होणार नाही. पोर्टलवर लवकरात लवकर दर्जेदार कंपन्यांची निवड व्हावी व शेतात एका महिन्यांत सोलर पंप बसविला जावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
चौकट.
मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या एकाच गटात क्षेत्र जास्त असण्याच्या या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना पंपाची क्षमता निवडताना मोठ्या प्रमाणात निराशा होत आहे ज्या गटांमध्ये विहीर किंवा बोरवेल आहे त्याच गटांमध्ये तुम्हाला जर 5 एचपी किंवा 7.5 एचपी सोलर पंप घ्यायचा असेल तर त्या गटांमध्ये 5 एचपी साठी 2.5 पेक्षा जास्त क्षेत्र व 7.5 एचपी साठी 5 एकर पेक्षा जास्त एकाच गटात क्षेत्र असणे गरजेचे आहे या जाचक अटीमुळे शेतकरी निराश झाले आहेत..
