
मुख्य संपादक अशोक गलांडे सिरसाळा
सिरसाळा येथील नागरिकांनी महावितरण कंपनीला सुविधा मिळत नसल्याने वीज बिल वसुली थांबवण्याचा इशारा दिला आहे. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने आधी सुविधा द्याव्यात, मगच वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सिरसाळा येथे महावितरण कंपनी आज पासून वीज बिल वसुली मोहीम राबवणार असल्याची माहिती समजली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी वसुली करताना महावितरणने सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. उलट, वारंवार वीज खंडित होणे, नादुरुस्त रोहित्र, जीर्ण पोल आणि तारांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.रमजान महिन्याच्या सुरुवातीला आणि उन्हाळ्याच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्याने सिरसाळकरांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे, जोपर्यंत गावातील रोहित्र, डीपी, नवीन तारा इत्यादी सुविधा सुरळीत होत नाहीत, तोपर्यंत वसुली करू नये, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.या संदर्भात, सिरसाळा येथील नागरिकांनी कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, अंबाजोगाई यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत उपकार्यकारी अभियंता, परळी, कनिष्ठ अभियंता, सिरसाळा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, सिरसाळा यांनाही पाठवण्यात आली आहे.या निवेदनात, नागरिकांनी महावितरण कंपनीला सुविधा सुधारण्याची आणि आज पासून सुरू होणारी वसुली थांबवण्याची विनंती केली आहे.


